पोस्ट ऑफिसच्या कॉर्नरवरून गाडी उजवीकडे झर्रकन वळवली आणि हायवेच्या सिग्नलला थांबलो. नेहमीप्रमाणेच पेन,पिशव्या विकणारी मुले गाडीपाशी आली. आज नेमकं दुपारी ऊन जास्त असल्याने गाडीत एसी सुरू होता. अर्थात त्यामुळे काचाही बंदच!
मुले नेहमीप्रमाणेच गाडीजवळ आली आणि पेन घ्या म्हणून आग्रह करू लागली. मी एरवी घेतो त्यांच्याकडून अशा वस्तू,पण आज मी त्यांना टाळले. मुले गाडीजवळ घुटमळत होती. मुलाने तर बोनेटवर आडवे पडून हात जोडले. त्याच्या - माझ्या मध्ये आता फक्त गाडीची समोरची काचच होती. ही नवीनच ट्रिक आज पाहायला मिळाली अन त्याच्या धाडसाची गंमत ही वाटली.
काचेतून त्याचे लक्ष dashbord वर ठेवलेल्या सफरचंद कडे गेले आणि त्याने ते खुणेनेच मागितले. मी त्याला खुणेनेच ते त्याच्या कामाचे नाही असे सांगितले. पण तेवढ्यात तो बोनेटवरून उतरून माझ्या बाजूच्या खिडकीजवळ येवून उभा राहिला. मी काच खाली घेतली आणि सांगितले की ते खेळण्यातले सफरचंद आहे, खायचे नाही. तो आणि त्याच्याबरोबर असलेली छोटी मुलगी उत्सुकतेने माझ्या हातातील सफरचंद पाहत होती.
मी त्याच्या हातात ते थर्माकोल चे सफरचंद दिले आणि दोघेही आनंदाने मागच्या गाडीकडे गेले. मी काच वर घेतच होतो की दोघे घाईने पुन्हा माझ्याकडे आले आणि काचेवर टक टक केले. सिग्नल हिरवा होण्यास आता अवघे काही सेकंद उरले होते. मी काच थोडी खाली घेतली आणि तीचे शब्द कानावर पडले.
" अंकल, याचे किती पैसे द्यायचे?"
सिग्नल हिरवा झाला होता. मागच्या गाडीचा हॉर्न वाजायला सुरुवात झाली होती. मी डोळ्यात आलेले पाणी थोपवत हँड ब्रेक काढला, आणि सिग्नल सोडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा